हिंगणघाट प्रकरण

मुळात हिंगणघाट प्रकरणाचा विचार करताना एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे आजच्या तरुणाईला प्रेम म्हणजे काय, हेच कळत नाही… प्रेम म्हणजे प्रत्येक वेळी ‘मिळवणं’च असतं, असं नाही… मी असंही नाही म्हणतं की प्रेम म्हणजे प्रत्येक वेळी ‘त्याग’च… पण प्रेमात एकमेकांच्या इच्छांचा, मतांचा, शरीराचा, भावनांचा पूर्णपणे एकमेकांचा आदर असणं ही मूलभूत गरज आहे… आणि जिथे प्रेम आहे, तिथे एकमेकांना कोणत्याच प्रकारची हानी पोहचवण्याचा साधा विचारही येऊ शकत नाही, इतकं मला कळतं…!
आणि माझ्यासाठी ही एकतर्फी प्रेमाने वगैरे केलेली हत्या मुळीच नाहीये… हे फक्त आणि फक्त एका पुरुषाच्या दुखावलेल्या अहंकाराने समस्त स्त्री-वर्गाला त्यांची लायकी दाखवण्यासाठी केलेलं कृत्य आहे! आणि जो समाज आता मोठमोठ्याने न्यायासाठी आक्रोश करतोय तो समाज बहुतेक हे विसरलाय कि या मानसिकतेला तयार करणारं दुसरं-तिसरं कुणी नसून हा समाजच आहे आणि याच समाजाने या मानसिकतेला नेहमी खतपाणी घातलं आहे. आणि माझी पूर्ण खात्री आहे की हा पुरुषसत्ताक समाज त्याच हे आद्यकर्तव्य यापुढेही पार पाडेल.

आणि फक्त शिक्षा देऊन किंवा कठोर शिक्षा देऊन हे प्रकार होणं थांबतील, असं मला वाटत नाही. मला नाही माहीत नेमका उपाय काय आहे पण शिक्षा हा उपाय नाही हे नक्की!
मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात वाईट काहीच नाही पण त्यानेही हे प्रकार थांबतील अशातला भाग नाही, याच घटनेच्या अनुषंगाने पाहिलं तर जरी तिला स्वसंरक्षण येत असतं तरी ती स्वतःच रक्षण करू शकली नसती. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही मुलगी ही कोणाचीही जबाबदारी नाहीये. प्रत्येकाने फक्त स्वतःची जबाबदारी घेतली तर प्रश्नच मिटेल. अर्थात, आपल्या हातून अस कधीही घडणार नाही, ही जबाबदारी!
आणि प्रत्येक प्रॉब्लेमच मला सर्वप्रथम एकच solution सुचतं आणि ते म्हणजे शिक्षण! करिअर घडो अगर न घडो पण माणसाला माणूस म्हणून घडवणारं शिक्षण! आणि या संदर्भात तर खास करून मानवी हक्कांचं शिक्षण फार महत्त्वाचं वाटतं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला विचारस्वातंत्र्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि जीविताचा समान हक्क आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे त्या मुलाला त्या मुलीवर प्रेम करण्याचा हक्क आहे, त्याचप्रमाणे त्या मुलीला त्याच्यावर प्रेम न करण्याचा, आणखी कोणावर प्रेम करण्याचाही हक्क आहे. आणि वयक्तिक पातळीवर जेव्हा जेव्हा आपल्या ओळखीतील कोणीही व्यक्ती अशा चुकीच्या दिशेने वाटचाल करत असेल तेव्हा तिला समजावणं, हे आपलं कर्तव्य आहे.

लोकलचा प्रवास

ठाण्याला उतरलेच होते की पुन्हा घाटकोपरला जायचं ठरलं. ज्या ट्रेनमधून उतरले पुन्हा त्याच ट्रेनमध्ये जाऊन बसले.(येताना ठाणे ट्रेनच होती आणि ठाण्याहून तीच ट्रेन पुन्हा CSMT ला जाणार होती.) ट्रेनमध्ये मी पुन्हा चढेपर्यंतच ट्रेनमधल्या सर्व सीट्स (फोर्थ सीट धरून) भरलेल्या! दुपारची वेळ होती! एवढी गर्दी असेल असं वाटलं नव्हतं पण बहुतेक ठाण्याहून सुटणारी ट्रेन आहे म्हणून सर्व ठाणेकरांनी ठरवून याच ट्रेनने जायचं ठरवलं असावं. सीट्सच्या मधल्या जागेत उभं राहायचं म्हटलं तर वर हँडलला पकडायला हाईट पुरतं नाही. त्यात रेल्वे प्रशासनाच्या मते सेंट्रलच्या लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांची उंची ही वेस्टर्न रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या उंचीपेक्षा जास्त असावी म्हणूनच की काय ते सेंट्रल रेल्वेमधले हँडल्स आणखी काही इंच उंचीवर असतात. पायाच्या बोटांवर जास्त भार देऊन वर हँडल पकडता तर येतं पण म पायात गोळे यायला लागतात आणि त्यात सेंट्रल रेल्वे इतकी काही हलते की अगदी कुठेच न धरता उभं राहायचं म्हणजे ट्रेन चालू झाली की एकदा हिच्या अंगावर आणि एकदा तिच्या अंगावर तोल जाऊन शिव्या खाणं ठरलेलंच. शेवटी नाईलाजाने दरवाजाजवळ त्या सीटसच्या मागील बाजूला टेकून उभी राहिले.
जरा सेटल झालेय असं वाटलं आणि मोबाईल हातात घेतला तोवर एक काकी आल्या आणि थोडी फार हवा जाण्यापूरती जागा राहिली होती ती पण “सरक” म्हणून भरून टाकली. या काकींसोबत त्यांची एक मैत्रीणही तिथेच येऊन उभी राहिली. त्या दोघी ना स्वतः कंफर्टेबली उभ्या होत्या ना त्यांच्यामुळे बाकीच्यांना राहता येत होतं. पण त्यांना तरी काय बोलणार… त्यांनाही त्यांच्या हाइटमुळे आणखी कुठे उभं राहून प्रवास करणं सोयीचं नव्हतं. त्यातल्या त्यात एवढ्या हडसून उभ्या होत्या की त्यांचं एकमेकींसोबतच, कॉलवरच संभाषण मला इच्छा नसतानाही ऐकणं भाग होत. त्यांच्या त्या काही मिनिटांच्या बोलण्यातून त्यांची आणखी एक मैत्रीण त्यांना दादरला भेटणार होती आणि त्या तिघी मिळून कुठेतरी पैसे घ्यायला चालल्या होत्या एवढं त्यांनी त्यांच्या कळत नकळत मला सांगितलं…
मधेच माझ्या समोरील बाजूस उभ्या असलेल्या मुलीला तिच्या मैत्रिणीने आत बोलावलं… बहुतेक सीट मिळाली असावी… तिला सीट मिळाली की नाही काही माहीत नाही पण मला तरी आरामात उभं राहायला जागा मिळाली. आणि त्या काकी पण जरा व्यवस्थित सेटल झाल्या. मी अगदी दरवाजाजवळच उभी होते… पळत्या झाडांचा, इमारतींचा आनंद घेत! मधेच काय झालं काय माहीत… नजर स्तब्ध झाली होती, पाहत तर होते समोर पण लक्ष नव्हतं… डोक्यात विचारांचं वेगळंच चक्र फिरत होतं आणि नजर मात्र शून्यात! आणि हे सगळं आता माझ्या समोरच असलेल्या त्या काकींपैकी एका काकींच्या क्षणार्धात लक्षात आलं. माझ्याकडेच बघत होत्या बहुतेक आणि त्यांनी पटकन “काय झालं? कसला विचार करतेयस एवढा? लक्ष कुठेय?” असा प्रश्नांचा भडिमार चालू केला. मी फक्त “काही नाही, काही नाही” म्हणून मी त्या विचारांतून बाहेर आल्याचा आव आणत पुन्हा बाहेर बघत राहिले. आणि या प्रसंगाचा पुन्हा विचार करताना जवळपास दोन वर्षांपूर्वी लोकलवर लिहिलेली माझीच एक कविता मला आठवली. त्याच निमित्ताने ही कविता शेअर करतेय…

मुंबई लोकलचा प्रवास
म्हणजे प्रगतीचा ध्यास
स्वतः तर स्वतःचे ध्येय गाठतेच
अन इतरांनाही मार्गी लावते…

मुंबई लोकलचा प्रवास
म्हणजे सहनशीलतेचा कळस
स्वतः तर सर्वांना झेलतेच
अन प्रवाशांसमोरही आदर्श ठेवते…

मुंबई लोकलचा प्रवास
म्हणजे घड्याळाचे गुलाम
स्वतः तर वक्तशीर राहतेच
अन आपल्यालाही वेळेचे महत्व पटवून देते…

मुंबई लोकलचा प्रवास
म्हणजे जगण्याची आस
कितीही संकटे आली तरी
जिद्दीने करते ती मात त्यांवरी…

मुंबई लोकलचा प्रवास
म्हणजे समभावाचा पाठ
ती नाही विचारत कोणाला
तू कोण्या धर्म, जातीचा…

मुंबई लोकलचा प्रवास
म्हणजे माणूसकीवरचा विश्वास
सर्व मर्यादा करून पार
मदतीचा दिलेला हात…

मुंबई लोकलचा प्रवास
म्हणजे वास्तव मुंबईचं
हकीकत मुंबईकरांची
अन जाण समानतेची…

आपल्यासारखे आपणच

जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलते माझ्या मते त्यासाठी तिच्या ‘जवळचे‘ लोक जास्त जबाबदार असतात. एखाद्या व्यक्तीला असे विचार करण्यापासून रोखणं आपल्या आवाक्यात नसेलही पण ते विचार वळविण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. आणि अशा काहीशा विचारात असणाऱ्या व्यक्तीसोबत वागताना केलेली एखादी लहानातली लहान गोष्ट(विशेषतः त्या व्यक्तीच्या ‘जवळच्यांची’) तिला तिचे विचार कृतीत उतरवण्यास प्रवृत्त देखील करू शकते. कारण कोणीच असा निर्णय स्वखुशीने घेत नसतं. त्यामुळे बोलताना, वागताना समोरच्याचा विचार करून वागा. आपण कितीही म्हटलं फ्रेंड्समध्ये काय एवढा विचार करायचा, इतना चलता है वगैरे तरीही शेवटी प्रत्येक गोष्टीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या त्या व्यक्तीच्याही कळत नकळत परिणाम होतोच असतो.
लिहिण्याचं विषेश असं काही कारण नाही.
आणि जर तुमच्या मनात कधी असा विचार आलाच तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमची जागा या संपूर्ण जगात कोणीच घेऊ शकत नाही. मी फक्त कोणाच्या आयुष्यात नाही बोलत… संपूर्ण जगात! कारण जरी आपण बेस्ट नसलो तरी वेस्ट तरी नक्कीच नाही. आपण या जगातील सर्वात सुंदर, हुशार, महान, चपळ नसू पण मी ‘मी’ आहे, तुम्ही ‘तुम्ही‘ आहात. आणि या जगात प्रत्येक जण हा वेगळा आहे, हेच तर सर्वात मोठं साम्य आहे. ही विभिन्नता तशी प्रत्येक गोष्टीत दिसून येते पण आपल्याला नसेल जाणवत तर निदान एवढं तरी मान्य करावंच लागेल की आपला प्रत्येकाचा डी.एन.ए. वेगळा आहे. तुमच्यासारखीच दिसणारी, बोलणारी, वागणारी, विचार करणारी, हसणारी, चालणारी, रागावणारी, ओरडणारी, समजून घेणारी, समजावणारी आणि रडणारी देखील व्यक्ती होणे नाही. आपल्याला आपल्यातील काही गोष्टी वेगवेगळ्या प्रमाणात इतर अनेकांमध्ये आढळून येतील पण त्याने ते फक्त ‘आपल्यासारखे‘ होतात, ‘आपण‘ नाही..!

मेन्स्ट्रुअल हायजिनची वास्तविकता

मुळात मेन्स्ट्रुअल हायजिनवर बोलायला आपली आधी निदान मासिकपाळीवर मोकळेपणाने बोलण्याची मानसिकता हवी. मुलींना पाळी येणं हे नैसर्गिक असूनही ‘मासिकपाळी येते’, हे देखील मान्य करायला मुली सरसावत नाहीत तर मेन्स्ट्रुअल हायजिन तर दूरच राहिलं! मासिकपाळीबद्दलचे वेगवेगळे गैरसमज, अंधश्रद्धा यातच समाज एवढा गुरफटलेला आहे की या दिवसात काय काळजी घ्यावी, हा प्रश्न यांना इतका काही महत्त्वाचा वाटतं नाही. आणि मी काही या लेखात आपण काय काळजी घ्यावी आणि का घ्यावी हे सांगणार नाहीये. पण कालच झालेल्या ‘मेन्स्ट्रुअल हायजिन डे‘च्या निमित्ताने मेन्स्ट्रुअल हायजिनची आपल्याकडची वास्तविकता मांडण्याचा प्रयत्न केलाय…
मुली एकच पॅड दिवसभर अगदी १२-१२ तास वापरायला कमी करत नाहीत आणि कपडा वापरणाऱ्या तो कोणाला दिसायला नको म्हणून असा काही इतर कपड्यांखाली लपवून सुकत घालतात की तो सुकतो खरचं की फक्त त्यातलं पाणी शोषून घेतलं जातं कोणास ठाऊक! आणि पॅड वापरला म्हणजे झालं, तो कसाही का असेना चुकून मोरीत पडलेला असला तरीही तो चांगलाच, असा समज ठेवणाऱ्यांची एक वेगळीच व्यथा आहे. पाळीच्या वेळी लोणच्याला हाथ न लावणं, इतर कोणाला स्पर्श करणं या सगळ्याचं अगदी काटेकोरपणे पालन केलं जातं पण तेच कपडा किंवा पॅड स्वच्छ ठेवण्याबाबत काही दिसत नाही. ही अवस्था शहरात आहे तर ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल… काही आश्रमशाळांमध्ये तर मेन्स्ट्रुअल हायजिनच्या नावाखाली मुलींना एकदा वापरलेले पॅड पुन्हा धुवून वापरण्यास सांगितले जातात. तर महिला ऐनवेळी अक्षरशः जे मिळेल ते वापरतात कधी राख, कधी पानं, कधी काय!
खरं तर या गोष्टी फक्त इथे बोलून काही अर्थ नाही. प्रत्यक्षात यावर काय करता येईल, याचा विचार होणं गरजेचं आहे. तुमच्या काही कल्पना असतील किंवा तुम्ही इच्छुक असाल या विषयावर काम करण्यासाठी तर मला नक्की कळवा…!

माणूस म्हणूनि जग रे…

मला नेमकं आठवत नाहीये पण आठवी/नववीत असताना मी एका वक्तृत्व की निबंध स्पर्धेसाठी माझ्या लहान भावाला ‘आरक्षणा’वर लेख लिहून दिला होता. आमच्या पूर्वजांनी केलेल्या चुकांची शिक्षा आम्हाला का?… जातींवर आधारित आरक्षणामुळे समाजात समानता येण्याऐवजी, विषमतेची दरी रुंदावत चालली आहे… आरक्षण म्हणजे ‘खुल्या'(open/general) वर्गावर अन्याय आहे आणि आम्हालाही आरक्षण मिळायला हवं… अशा आशयाचा तो लेख होता आणि त्यामुळे आजही कधी ‘मराठा क्रांती मूक मोर्चा’चा उल्लेख झाला की माझा भाऊ मलाच त्याची जनक ठरवून मोकळा होतो(वास्तविक तसं काही नाहीये). आणि माझ्या त्या लेखामुळे त्याला बक्षीसही मिळालं होतं, सांगायचा उद्देश इतकाच की परीक्षकांनाही ते आवडलं होतं. मात्र या घटनेनंतर एक दिवस मला एका सरांनी शिक्षक कक्षात बोलावून बराच वेळ या विषयावर लेक्चर दिलं. आरक्षणाची गरज का आहे, याची मला जाणीव करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण माझं मतपरिवर्तन काही ते करू शकले नाहीत. तरी कुठेतरी दोन्ही बाजूंचा विचार करायला हवा, हा विचार मात्र त्यांनी माझ्या मनात रुजवला.दहावी झाल्यानंतर महितीपुस्तकेमधील मागासवर्गीय आणि खुल्या वर्गाच्या कट ऑफस् आणि फी मधली तफावत पाहून ‘तिरस्कारा‘ची भावना जणू वाढीस लागली. ऍडमिशनच्यावेळी ‘ओपनमध्ये आहेस!… कठीण आहे म हे कॉलेज लागणं’, ‘रिजर्व्हमध्ये असतीस तर इथे आरामात ऍडमिशन झालं असतं’ अशी सतत कानावर पडणारी वाक्य म्हणजे आगीत तेल! मला हवं ते कॉलेज पहिल्याच यादीत लागलं आणि या आरक्षणाचा फटका तसा मला काही बसला नाही. पण आपल्या टक्क्यांपेक्षा कमी टक्क्यांवर आरक्षित प्रवर्गाची लिस्ट क्लोज झाली की मात्र आपला जळफळाट होतो आणि आरक्षणामुळेच ऍडमिशन मिळालं नाही, असा गैरसमज आपण करून घेतो किंवा आपल्याला तेवढंच एक कारण मिळतं आपलं अपयश लपवण्यासाठी! नाही तर माझेच प्रयत्न कमी पडले, आणखी चांगला अभ्यास केला असता, आणखी चांगले टक्के मिळवले असते तर या लिस्टमध्ये नाव लागलं असतं, असा विचार केला असता ना आपण… अकरावीला असताना बहुतेक ‘महाराष्ट्र उत्सव’साठी वक्तृत्व स्पर्धेचा विषय हा ‘आरक्षणा’शी निगडित होता. आणि तेव्हा माझं मत आरक्षण हे आर्थिक निकषांवर असावं, असं होतं. पण निवड करणाऱ्या सिनिअरने हा विषय संवेदनशील आहे, असं म्हणून दुसरा विषय निवडण्यास सांगितल्याने मी या स्पर्धेत भागच नाही घेतला. जे होत ते चांगल्यासाठीच, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. जर या समस्येचं मूळच जातीनिहाय आहे तर आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यात काय अर्थ! कारण एखाद्या सवर्णाला कोणतीही संधी नाकारण्यात येत नाही जरी तो गरीब असला तरीही मात्र एखाद्या मागासवर्गीयाला त्याच्याकडे कितीही पैसा असला तरीही फक्त नि फक्त त्याच्या जातीमुळे कमी लेखले जाऊ शकते. त्यामुळे आता माझ्या मते हा पर्यायच नाहीये! आणि आर्थिक मागासवर्गीयांना देखील आरक्षण आहेच की! वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या देखील आहेत, त्यांनी त्यांचा लाभ घ्यावा.
तुमचे विचारही माझ्या आठवी-नववीतल्या विचारांशी, दहावी-अकरावीतल्या विचारांशी किंवा क्वचितच आता(तेरावी-चौदावीतल्या) विचारांशी मिळतेजुळते असतील. कारण आता मलाच माझे आधीचे विचार हे बालिश, पोरकट, पक्षपाती आणि पूर्वग्रहदूषित वाटतात. नेमकं माहीत नाही कधी आणि कसे हे विचार बदलले पण मी ज्या शिक्षकांकडून शिकलेय त्यांचा नक्कीच खूप प्रभाव आहे. असंच कोणते तरी सर एकदा म्हणाले होते की ए.सी. मध्ये बसून, हजारो रुपये क्लासला फी भरून, आईवडिलांनी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन ९०% काढणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा कोणत्याही सुविधा नसताना आणि आईवडिलांनाही शिक्षणाच्या क्षमतेची पुरेशी जाणीव नसताना स्वयंप्रेरणेने स्वबळावर शिकून ५०% काढणाऱ्या विद्यार्थ्याचं यश मोठं आहे. आणि हे नक्कीच विचार करायला भाग पाडणारं होतं. आणखी एक गोष्ट आठवते ती म्हणजे एका मैत्रिणीला आरक्षणातूनच पण ‘खुल्या’ प्रवर्गाच्या कट ऑफपेक्षा अधिक टक्क्यांनी कॉलेज लागलं आणि या गोष्टीचा तिला एक वेगळाच आनंद झाला होता. मला वाटतं तो आनंद होता या जाणिवेचा की तिला आरक्षणाशिवाय देखील ऍडमिशन मिळालं असतं, आणि ती आरक्षणावर विसंबून नव्हती. कालांतराने अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे विचार ऐकले, मागासवर्गीयांच्या व्यथा त्यांच्या तोंडून ऐकल्या, अनेक आदिवासी पाड्यांवरची परिस्थिती जवळून पाहिली आणि आपण किती चुकीचा विचार करत होतो, हे कळून चुकलं.
कित्येक वर्षे शिक्षणाचा अधिकार न मिळाल्यामुळे घरी, समाजात शिक्षणाला पोषक वातावरण मिळतं नाही. मागासवर्गीयांची अशी कितीतरी कुटुंब, गावं मिळतील की जेथे अजूनही एकही पदवीधर नाही. आणि अशा परिस्थितीत त्यांना स्पर्धेत उतरवणं, हे समानतेचं असूच शकत नाही. नि त्याही पलीकडे जरी त्यांच्यात शिक्षणाची इच्छा निर्माण झाली तरी सो कॉल्ड उच्चवर्णीय जे बहुतांश शिक्षणसंस्थांचे विश्वस्त, मुख्याध्यापक, लिपिक आहेत ते त्यांना शिक्षणाची संधी खरचं मिळू देतील, याची खात्री कशी करायची?? सद्यस्थिती पाहता अशी काहीच लक्षण दिसत नाहीत. नोकरीच्या बाबतीत देखील हे तितकेच खरे आहे. आरक्षणामुळे मात्र या संस्था कायद्याने बांधील आहेत. आता तुम्ही बोलाल की आम्ही जातपात नाही मानत… पण खरचं ते कितपत खरं आहे, हे स्वतःलाच विचारून बघा! आजही माझ्या कित्येक मैत्रिणींना घरून सक्त ताकीद दिलेली आहे, ‘तुला वाट्टेल त्या मुलाशी तुझं लग्न लावून देऊ पण एस.सी./एस.टी. नको’ तुम्ही कारणं लाख द्या… जीवनशैली वेगळी आहे, खाद्यसंस्कृती वेगळी आहे पण माणसंच आहेत ना! कि आजही आपण हे मान्य करायला तयार नाही आहोत??? कारण तसं नसतं तर ‘ऑनर किलिंग‘च्या नावाखाली इतके बळी गेले नसते. आजही माझ्या मैत्रिणीला बाबासाहेबांचं पुस्तक घरी लपवून लपवून वाचावं लागतं. खरचं त्यांचं कार्य फक्त अस्पृश्य समाजापुरतं मर्यादित आहे का? आणि तसं असेल तर भारतरत्न आणि संविधानाचे शिल्पकार का??? आजही माझ्या मित्राची आई त्याला निळ्या रंगाचं शर्ट घेऊ देत नाही का तर तो ‘जय भीम’वाल्यांचा रंग आहे. आजही कोणी जास्त शिवीगाळ करत असेल तर ‘महारांचा आहेस का?’ असं सहज म्हटलं जातं… आताही म्हणाल जातीव्यवस्था संपलीय???

जी जात नाही ती जात‘, असं म्हणतात तेच खरं आहे. त्यामुळे जातीव्यवस्था मुळासकट नष्ट होण्याची मला तरी अपेक्षाच नाहीये. माणसानेच निर्माण केलेली गोष्ट माणूस स्वतः नष्ट करू शकत नाहीये उलट ती गोष्ट माणसाला नष्ट करतेय, माणसातल्या माणुसकीला नष्ट करतेय. जात ही माणसापेक्षा महत्वाची नाहीये, हे आपण लक्षात घ्यायला हवं. मुळात तुम्ही एखाद्याला त्याच्या नाव आणि गावावरून, कपड्यांच्या रंगावरून, आदर्शावरून, तत्वांवरून त्याची जात गृहीत धरून त्याला त्याआधारावर ‘जज‘ करू नका..! काही म्हणतील नाही ते असेच असतात नि तसेच असतात पण मला फक्त एवढंच वाटतं ते कसे पण असो, ती पण माणसं आहेत आणि आपण माणूस म्हणून त्यांच्यासोबत माणुसकीनेच वागलं पाहिजे, त्यांना देखील त्यांच्या सर्व मानवाधिकारांचा पुरेपूर लाभ घेता आला पाहिजे.!