आगळेवेगळे संकल्प

मुळात मला पहिला प्रश्न हाच पडला होता की खरंच कोणी शैक्षणिक वर्ष सुरू होणार म्हणूनही संकल्प करतं का… म्हटलं बघावं मंडळींना विचारूनच… आणि आश्चर्य म्हणजे बऱ्याच जणांनी बरेच संकल्प केल्याचं मला सांगितलं… काहींनी आपले संकल्प बोलून दाखवणार नाही तर फक्त करूनच दाखवणार, असा भलताच आत्मविश्वास दाखवला. आणि बऱ्याच जणांनी मलाच उलटप्रश्न केला पण “माझा ‘संकल्प’सोबत काहीही संबंध नाही”, असं बोलून मी मात्र तो प्रश्न हसण्यावारी नेला… तर काहींनी कॉलेजचं हे शेवटचं वर्ष असल्याने यावर्षी तरी एक गर्लफ्रेंड सेट करायचीय, दारू प्यायला कोणासोबत बसायचं नाही कारण दारू तर शेअर करावी लागतेच सोबत सोडा आणि चकणा देखील जास्त लागतो, आधी केलेलेचं संकल्प पूर्ण करायचे आहेत असे आगळेवेगळे संकल्प केल्याचे देखील सांगितले.
यांचे आगळेवेगळे संकल्प पाहता मला माझा एक आगळावेगळा संकल्प आठवतो… मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात ठरवून केलेला बहुतेक एकमेव असा संकल्प… आणि तो म्हणजे ‘वैध तिकिटाशिवाय ट्रेनने प्रवास करायचा नाही‘… असा संकल्प करण्याचं कारण तिकीट तपासनीसाने पकडलं वगैरे असं काही नव्हतं कारण मी सर्रास विनातिकीट प्रवास करायचे. जवळजवळ वर्षभर हे असंच चालू राहिलं. काही महिन्यांमध्ये तर मी कॉलेजपर्यंतचा पाससुद्धा नव्हता काढला. आणि नेहमीच्या सवयीने मला एक अंदाजही आला होता की टी.सी. कोणकोणत्या स्टेशनवर कोणत्या प्लॅटफॉर्मच्या कोणत्या बाजूला असतात… तरीही स्वतःलाच सातत्याने काहीतरी चूक करतोय, हे जाणवत होतं म्हणून गेल्यावर्षी प्रजासत्ताक दिनी हा संकल्प केला… तसा पाळलाय देखील मी तो पण होते कधी कधी गलतीसे मिस्टेक… त्यात ‘यू. टी. एस.‘ऍपमुळे तर माझा संकल्प पार पाडणं, माझ्यासाठी आणखी सोप्प झालंय.
बऱ्याच जणांचे आगळेवेगळे संकल्प वाचून झाल्यावर बातमीच्या दृष्टीने काही मोजकेच संकल्प निवडले. पण निवडलेल्यांपैकी एक तरी ऐनवेळी टांग देणार, हे नेहमीचं आहे. शेवटी ऐनवेळी ते ऍडजस्ट करून हे आर्टिकल पूर्ण केलं…!

Advertisements

आणि जेव्हा एक अक्षर उरतं

ट्रान्सलेशनचं तसं माझं हे पहिलंच आर्टिकल होतं. करायला पुरेसा वेळ मला देण्यात आला होता…जवळजवळ दीड दिवसाचा! पण मी मेसेजच संध्याकाळी पाहिला! दुसऱ्या दिवशीच्या काही गोष्टी ठरलेल्या होत्या त्यामुळे त्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत जागून करायचं ठरवलं खरं पण दिवसभराच्या थकव्यामुळे एकदा वाचूनच झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या करायचं म्हटलं तर कॉल आला आणि मला आवरून निघावं लागलं. प्रवासात ते लिहिणं मला काही जमणारं नव्हतं म्हणून पुन्हा एकदा वाचूनच काढलं. आणि शेवटी दुपारी पीडीपी(प्रियदर्शनी पार्क)मध्ये बसून पूर्ण आर्टिकल लिहून ठेवलं. पण काही शंका होत्याच आणि संध्याकाळी एका मैत्रिणीला पण भेटणार होते… विचार केला ती भेटल्यावर तिच्याकडून ते बरोबर आहे का याची खात्री करून घेईन आणि नंतर मेल करेन. माझा वेळही तसा शिल्लक होता. पण तिला भेटल्यावर वेळ कसा निघून गेला काही कळलंच नाही. रात्री घरी परतताना ट्रेनमध्ये तो लेख मीच माझा चेक करायला म्हणून एकदा वाचला. सिलेक्ट ऑल करून कॉपी करून पेस्ट करणार होते पण लक्ष कुठे होतं काय माहित..! सिलेक्ट ऑल करून चुकून कोणतं तरी बटण दाबलं आणि सगळं काही उडवून टाकलं. आधीच दिवसभर मूड काही चांगला नव्हता आणि असं ऐनवेळी सगळ्या मेहनतीची माती केल्याने ट्रेनमध्येच रडायला लागले. काही करून ते कंटेंट परत मिळवता येईल का म्हणून उलाढाल करून बघितली, काही मित्रमैत्रिणींना देखील विचारलं पण काही उपयोग झाला नाही. त्या चुकून दबलेल्या अक्षराशिवाय काहीच उरलं नव्हतं.
माझं काही धाडस होतं नव्हतं हे कळवायचं. थोडा वेळ असता तर मी पुन्हा टाइप करून दिलं असतं पण माझी डेडलाईन जवळजवळ संपली होती. शेवटी व्हाट्सपवर मेसेज टाइप केला, बऱ्याचदा बॅकस्पेसचा वापर करून कमीतकमी शब्दात घडलेला प्रकार मांडला. आणि समोरून अगदी सहजतेने ‘ओके. उद्या दुपारपर्यंत दे’ एवढाच रिप्लाय मिळाला. मी मात्र विनाकारणच भीत होते काय बोलतील, पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत वगैरे… अंगात त्राण नव्हतेच आणि मूडही नव्हता म्हणून म सकाळीच लिहायचं ठरवलं आणि सकाळी लिहून मेल पाठवूनही दिला. माझ्या शंकाही त्यांनाच सागितल्या..!

नंतर एक-दोन दिवस हे आर्टिकल पेपरमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर आशा सोडून दिली. हे काही आता छापून येत नाही, असं मी गृहीतच धरलं होतं. पण काल नेहमीच्या सवयीप्रमाणे वेबसाईटवर पेपर वाचत होते. मुख्य पुरवणीची दोन-तीन पानंच वाचून झाली होती पण नेट काही धड चालेना काहीतरी करूया म्हणजे नेट चालेल अशा विचाराने मुंबई टाइम्स ओपन केला आणि शेवटपर्यंत वाचला. शेवटच्या पानावर हे आर्टिकल दिसलं..!