लोकलचा प्रवास

ठाण्याला उतरलेच होते की पुन्हा घाटकोपरला जायचं ठरलं. ज्या ट्रेनमधून उतरले पुन्हा त्याच ट्रेनमध्ये जाऊन बसले.(येताना ठाणे ट्रेनच होती आणि ठाण्याहून तीच ट्रेन पुन्हा CSMT ला जाणार होती.) ट्रेनमध्ये मी पुन्हा चढेपर्यंतच ट्रेनमधल्या सर्व सीट्स (फोर्थ सीट धरून) भरलेल्या! दुपारची वेळ होती! एवढी गर्दी असेल असं वाटलं नव्हतं पण बहुतेक ठाण्याहून सुटणारी ट्रेन आहे म्हणून सर्व ठाणेकरांनी ठरवून याच ट्रेनने जायचं ठरवलं असावं. सीट्सच्या मधल्या जागेत उभं राहायचं म्हटलं तर वर हँडलला पकडायला हाईट पुरतं नाही. त्यात रेल्वे प्रशासनाच्या मते सेंट्रलच्या लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांची उंची ही वेस्टर्न रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या उंचीपेक्षा जास्त असावी म्हणूनच की काय ते सेंट्रल रेल्वेमधले हँडल्स आणखी काही इंच उंचीवर असतात. पायाच्या बोटांवर जास्त भार देऊन वर हँडल पकडता तर येतं पण म पायात गोळे यायला लागतात आणि त्यात सेंट्रल रेल्वे इतकी काही हलते की अगदी कुठेच न धरता उभं राहायचं म्हणजे ट्रेन चालू झाली की एकदा हिच्या अंगावर आणि एकदा तिच्या अंगावर तोल जाऊन शिव्या खाणं ठरलेलंच. शेवटी नाईलाजाने दरवाजाजवळ त्या सीटसच्या मागील बाजूला टेकून उभी राहिले.
जरा सेटल झालेय असं वाटलं आणि मोबाईल हातात घेतला तोवर एक काकी आल्या आणि थोडी फार हवा जाण्यापूरती जागा राहिली होती ती पण “सरक” म्हणून भरून टाकली. या काकींसोबत त्यांची एक मैत्रीणही तिथेच येऊन उभी राहिली. त्या दोघी ना स्वतः कंफर्टेबली उभ्या होत्या ना त्यांच्यामुळे बाकीच्यांना राहता येत होतं. पण त्यांना तरी काय बोलणार… त्यांनाही त्यांच्या हाइटमुळे आणखी कुठे उभं राहून प्रवास करणं सोयीचं नव्हतं. त्यातल्या त्यात एवढ्या हडसून उभ्या होत्या की त्यांचं एकमेकींसोबतच, कॉलवरच संभाषण मला इच्छा नसतानाही ऐकणं भाग होत. त्यांच्या त्या काही मिनिटांच्या बोलण्यातून त्यांची आणखी एक मैत्रीण त्यांना दादरला भेटणार होती आणि त्या तिघी मिळून कुठेतरी पैसे घ्यायला चालल्या होत्या एवढं त्यांनी त्यांच्या कळत नकळत मला सांगितलं…
मधेच माझ्या समोरील बाजूस उभ्या असलेल्या मुलीला तिच्या मैत्रिणीने आत बोलावलं… बहुतेक सीट मिळाली असावी… तिला सीट मिळाली की नाही काही माहीत नाही पण मला तरी आरामात उभं राहायला जागा मिळाली. आणि त्या काकी पण जरा व्यवस्थित सेटल झाल्या. मी अगदी दरवाजाजवळच उभी होते… पळत्या झाडांचा, इमारतींचा आनंद घेत! मधेच काय झालं काय माहीत… नजर स्तब्ध झाली होती, पाहत तर होते समोर पण लक्ष नव्हतं… डोक्यात विचारांचं वेगळंच चक्र फिरत होतं आणि नजर मात्र शून्यात! आणि हे सगळं आता माझ्या समोरच असलेल्या त्या काकींपैकी एका काकींच्या क्षणार्धात लक्षात आलं. माझ्याकडेच बघत होत्या बहुतेक आणि त्यांनी पटकन “काय झालं? कसला विचार करतेयस एवढा? लक्ष कुठेय?” असा प्रश्नांचा भडिमार चालू केला. मी फक्त “काही नाही, काही नाही” म्हणून मी त्या विचारांतून बाहेर आल्याचा आव आणत पुन्हा बाहेर बघत राहिले. आणि या प्रसंगाचा पुन्हा विचार करताना जवळपास दोन वर्षांपूर्वी लोकलवर लिहिलेली माझीच एक कविता मला आठवली. त्याच निमित्ताने ही कविता शेअर करतेय…

मुंबई लोकलचा प्रवास
म्हणजे प्रगतीचा ध्यास
स्वतः तर स्वतःचे ध्येय गाठतेच
अन इतरांनाही मार्गी लावते…

मुंबई लोकलचा प्रवास
म्हणजे सहनशीलतेचा कळस
स्वतः तर सर्वांना झेलतेच
अन प्रवाशांसमोरही आदर्श ठेवते…

मुंबई लोकलचा प्रवास
म्हणजे घड्याळाचे गुलाम
स्वतः तर वक्तशीर राहतेच
अन आपल्यालाही वेळेचे महत्व पटवून देते…

मुंबई लोकलचा प्रवास
म्हणजे जगण्याची आस
कितीही संकटे आली तरी
जिद्दीने करते ती मात त्यांवरी…

मुंबई लोकलचा प्रवास
म्हणजे समभावाचा पाठ
ती नाही विचारत कोणाला
तू कोण्या धर्म, जातीचा…

मुंबई लोकलचा प्रवास
म्हणजे माणूसकीवरचा विश्वास
सर्व मर्यादा करून पार
मदतीचा दिलेला हात…

मुंबई लोकलचा प्रवास
म्हणजे वास्तव मुंबईचं
हकीकत मुंबईकरांची
अन जाण समानतेची…