लव्ह ट्राइंग्ल

मी, पाऊस आणि धरती यांच्यामधील आगळावेगळा असा लव्ह ट्राइंग्ल या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलाय. पावसाला तू, तो म्हणून तर धरतीला ती म्हणून संबोधलं आहे.

चिंब भिजायचंय मला तुझ्या प्रेमात
तुला मात्र तिलाच बुडवायचंय स्वतःत
तुला घट्ट धरून ठेवायचंय मला माझ्या मिठीत
तुला तर शिरायचंय या धरतीच्या कुशीत
हा पण नाही का एक लव्ह ट्राइंग्ल??
माझं प्रेम तुझ्यावर आणि तुझं प्रेम तिच्यावर…

तिला तू भेटावास आणि वारंवार भेटत राहावास
म्हणून ही संपूर्ण सृष्टी प्रयत्न करतेय…
माझ्या वाट्याला शिंपडले जातायत
फक्त तिच्यावरच्या प्रेमवर्षावातील काही थेंब
तरीही मी करतच राहते अयशस्वी प्रयत्न
तुम्हाला एकमेकांपासून दूर करण्याचे
काय करू… विसरते मी कधीकधी
तुमचं एक होणं गरजेचंच आहे हे…
पण मला सतत जाणवते तुम्हा दोघांमध्ये येण्याची खंत
बहुदा म्हणूनच टाळते आता पावसात भिजणं…

तुझं येणं मला आता काही आनंदित करीत नाही
तुला तिच्यात पाणीपाणी होऊन विलीन होता यावं म्हणून मी तुझी वाट सोडली खरी
पण तुझ्या या शेवटच्या इच्छेपोटी माझी सारी स्वप्ने धुळीला मिळाली
तुला तिच्याजवळ जाताना पाहिलं
आणि माझी अवस्था त्या गरम तेलातल्या भजीसारखी झाली…

इतकं सगळं होऊनही आजही त्यांच्या संगमाचा सुगंध मला प्रफुल्लित केल्याशिवाय राहत नाही…
पण सध्या त्याचं काही खरं दिसत नाही
कधीकाळी माझ्यापासून दूर दूर पळणारा तो
आता मी जाईन तिथे असा काही बरसतो
जणु मला स्वतःची आठवण करून देतो…

तुला सामोरं जायची आता नाही क्षमता माझ्यात
तुझं काय… तू थोडा वेळ गर्जशील, बरसशील आणि निघून जाशील
पण माझे अश्रू काही बरसायचे थांबत नाहीत…
ते वाहत राहतात तुझ्याचसाठी, तुझ्याचसोबत…!